रत्नागिरी : तीन महिन्यांच्या रेशन धान्य वितरणास सुरुवात…

रत्नागिरी : सध्या येथील रास्त धान्य दुकानांमधून जूनसह जुलै व ऑगस्ट असे तीन महिन्याचे धान्य एकदाच मिळत आहे. एकाचवेळी धान्य पॉस मशिनवर वाटपास उपलब्ध करून देण्याची जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक, मालक संघटनेची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने पूर्ण केल्याने वाटपाचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे शिधापत्रिकाधारक खूष आहेत. मात्र, थकीत कमिशन अद्याप न मिळाल्याने दुकानदार नाराज आहेत.

पावसाचा वाढता जोर, पूर येण्याची शक्यता अशा अनेक कारणांमुळे धान्य खराब होण्याची शक्यता लक्षात घेता तसे होऊ नये म्हणून यावर्षी जून महिन्यातच पुढील दोन अशा तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, तीन महिन्याचे धान्य दुकानात ठेवण्यास जागा अपुरी आहे. एक-दोन महिन्यासाठी जवळपास जागा भाड्याने घेणे दुकानदारांना परवडणारे नाही.

त्यामुळे दुकानदारांना टप्या-टप्याने धान्य पुरवठा व्हावा व जूनचे धान्य वाटपाबरोबरच जुलै व ऑगस्टचे धान्य पॉस मशिनवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्याकडे केली होती. त्यानुसार या दोन्ही मागण्या मान्य झाल्याने उपलब्ध धान्यानुसार तीन महिन्याचे धान्य शिधापत्रिकाधारकांना दिले जात आहे. सध्या पाऊस कमी असल्याने व एकदाच तीन महिन्याचे धान्य मिळत असल्याने शिधापत्रिकाधारक रेशन दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 11/Jun/2025