चिपळूणमध्ये सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल!

रत्नागिरी : चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका परिसरात काल रात्री सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, १० जून २०२५ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण-कराड रोडवरील बहादूरशेख नाका येथील अलोरे एस.टी. स्टॉपजवळ अक्षय एकनाथ गाडगे (वय २९, रा. पर्वती, पुणे) याने आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हल्स (क्रमांक: MH१२/७/५९८८) रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली की त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. आरोपी गाडी तिथेच सोडून निघून गेला होता.

या प्रकारामुळे सार्वजनिक वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात येताच, चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गणेश भागवत नाळे (पोहेकों/७११) यांनी तात्काळ याबाबत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, १० जून २०२५ रोजी रात्री ८.४९ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८५ नुसार गुन्हा (गु.र.नं. १३६/२०२५) नोंदवण्यात आला आहे.

सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे अडथळा निर्माण करणे हे बेकायदेशीर असून, यामुळे इतरांना त्रास आणि धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 11-06-2025