रत्नागिरी जिल्हा परिषदेचा नासा दौरा यावर्षी लांबला

रत्नागिरी : जिल्हा परिषदेमार्फत यावर्षी जि. प. प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी नासा (अमेरिका) येथे सफर घडविण्यात येणार आहे, पण यावर्षी युध्दजन्य परिस्थितीमुळे परदेश दौऱ्यासाठी निर्माण झालेली व्हिसा मिळण्याची अडचण पाहता नासाचा दौरा थोडा लांबणीवर गेला आहे. यावेळेस जिल्हास्तरावर चाळणी परीक्षेत निवड झालेले एकूण २० विद्यार्थी लवकर नासा भेटीसाठी रवाना होणार आहेत. या विद्यार्थ्यांना २० जून रोजी व्हिसा प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले आहे.

नासा व इस्त्रो या अभ्यास दौ-यासाठी जिल्हा परिषद शाळा स्तरावर विद्याथ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून एकूण ५५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यातील २० मुले नासासाठी निवडली गेली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नासा व इस्रो भेटीसाठी जि. प. प्रशासन स्तरावर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून नासा व इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली होती. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच सर्वतोपरी सहकार्य दिलेले आहे. या दौऱ्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

नासा भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी जूनच्या पहिल्या आठवडयात दौरा करणार होते, पण हा दौरा युध्दजन्य परिस्थितीमुळे लांबणीवर गेला आहे. मात्र ही परिस्थिती निवळता व्हिसा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. आता येत्या २० जून रोजी या विद्यार्थ्यांना नासा दौऱ्यासाठी विकसा प्रक्रियेसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या विद्यार्थ्यांसोबत जि. प. अधिकारी, शिक्षक अशी टिम नासा दौऱ्यावर निघणार आहे.

नासा भेटीसाठी निवडलेले विद्यार्थी मंडणगड तालुका – रूतिका लबू खापरे, शेडवई शाळा, श्रेयस गजानन पवार कुडूक खुर्द नं.१, दापोली तालुका- जान्हवी राजेंद्र तांबुटकर विरसई, अंशुल विक्रांत पाटील कुडावळे नं. १. खेड तालुका यशस्वी प्रदीप चव्हाण सवेणी नं. १, आदिती नागेश पवार-सवेणी नं. १. चिपळूण तालुका सृष्टी सदानंद भुवड-तुरंबव नं. १, श्रावणी वैभव गमरे पेढांबे नं. १. गुहागर तालुका सोहम समीर बावधनकर-गुहागर नं. १, स्वरा संतोष लांजेकर- मुंढर नं. १. संगमेश्वर तालुका अर्णव राहुल शिंदे-पाटगाव, समिक्षा सुरेश बोडेकर चाफवली नं. १. भावना दत्तात्रय सावंत देवाख नं. ४. रत्नागिरी तालुका कार्तिकी सदानंद सागवेकर-साठरे नं. २, लावण्या ऋषिकेश पवार – पानवल होरंबेवाडी. लांजा तालुका सुनिता दिलीप तावडे-बनगुळे नं. १. शौर्य अमित जाधव-लांजा नं. ५, राजापूर तालुका देवयानी नरेश आग्रे-कोतापूर नं. १. शिवाली संदीप घुमे कोतापूर नं.१. पद्मश्री निलेश गोंडाळ-गोठणे दोनिवडे नं. २ यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 11/Jun/2025