संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावरील सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरुवात

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ वरील गैरसोयी दूर होणार आहेत. फलाटावर पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर स्थानकात फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. सतत पाठपुरावा आणि वेळोवेळी अधिकारीवर्गाशी केलेल्या चर्चेतून हे सकारात्मक चित्र साकार होत आहे.

फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा पाढा निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप सतत वाचून दाखवत आहे, फलाटावरील पेव्हर ब्लॉक, पादचारी पूल, आसन व्यवस्था, स्वच्छ पाणी, पंखे, दिवे, सांडपाण्याची व्यवस्था, तिकीट आरक्षणाची सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने तीन एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा म्हणून निवेदन,आंदोलन असे अनेक विषय या ग्रुपने हाताळले.

हे प्रयत्न करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून झटत आहेत. लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी, त्यांच्या शिफारशी यांच्या जोरावर कित्येक किचकट विषय मार्गी लावण्यात संघटनेला यश आले आहे. या कामात आमदार शेखर निकम यांनी सहकार्य केले आहे. जातीने या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करून सर्वतोपरी साह्य केले. या कामासाठी २३ लाख ३६ हजार ५५४ रुपयांता निधी उपलब्ध झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवासी, सामान्य जनता यांच्या वतीने आमदार श्री. निकम यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 11-06-2025