चिपळूणमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत १२ हेक्टरवर आंबा, काजू लागवड

चिपळूण : मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील तब्बल २३ शेतकऱ्यांनी सहभागी होत १२.५० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही लागवड केल्यामुळे झाडांची उत्तम वाढ होण्यास अनुकूल वातावरण मिळते, तसेच दीर्घकालीन उत्पादन क्षमतेत वाढ होते.

या मोहिमेमध्ये CR-TECHNIQUE (Climate Resilient Agriculture) या आधुनिक पद्धतीचा वापर करण्यात आला. या तंत्रामुळे पाण्याची बचत होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि फळझाडांची मुळे अधिक गडदवर रुजतात. याचे प्रात्यक्षिक चिपळूण तालुक्यातील १८ गावांमध्ये घेण्यात आले.

उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना या पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले.

या योजनेचा दुहेरी फायदा शेतकऱ्यांना होत आहे. एकीकडे रोजगार निर्मिती, तर दुसरीकडे दीर्घकालीन उत्पन्न मिळवण्याची संधी मिळाली आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भारही कमी होतो.

चिपळूण तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनादेखील आवाहन करण्यात येत आहे की, मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून फळबाग लागवड योजनेत सहभागी व्हावे आणि कृषी क्षेत्रातील ही प्रगतीची लाट आपल्या शेतीपर्यंत पोहोचवावी. अधिक माहितीसाठी स्थानिक सहायक कृषी अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 11/Jun/2025