मद्याच्या किंमतीत वाढ; शेअर्स आपटले

महाराष्ट्र सरकारने भारतीय बनावटीची विदेशी मद्य (आयएमएफएल) आणि देशी मद्यावरील करात (एक्साईज ड्युटी) मोठी वाढ केली आहे. या बातमीमुळे ब्रुअरीजच्या शेअर्सच्या किमती झपाट्यानं घसरल्या.

कामकाजादरम्यान युनायटेड ब्रुअरीज, अलाइड ब्लेंडर्स, रेडिको खेतान आणि युनायटेड स्पिरिट्स सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले होते. या कंपन्यांना शेअर बाजारात मोठा झटका बसला आहे.

कामकाजादरम्यान युनायटेड स्पिरिट्सचा शेअर ६.३९% नं घसरला आणि तो १५०७ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. युनायटेड ब्रुअरीजचा शेअर ०.४५% नं वाढून २०७५ रुपयांवर व्यवहार करत होता. अलाइड ब्लेंडरचा शेअर १.८२% नं घसरून ४३६.४५ रुपयांवर व्यवहार करत होता. रेडिको खेतानचा शेअर १.६५% नं घसरून २६११ रुपयांवर व्यवहार करत होता.

परवाना शुल्कातही वाढ

मद्याच्या दराबरोबरच मद्य विक्रीसाठी दिल्या जाणाऱ्या परवाना शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या दरात सर्वाधिक ५५ ते ८५ रुपये वाढ करण्यात आली आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत दरवर्षी १४ हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.

‘महाराष्ट्र मेड लिकर’, नवा ब्रँड

महाराष्ट्र मेड लिकर (एमएमएल) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असं उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या ब्रँडची नोंदणी करणं आवश्यक राहील. या निर्णयांचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर होईल. त्यानंतर जीआर काढून दरवाढ लागू केली जाईल.

क्वार्टर (१८० मिली) आता कितीला पडेल?

मद्याचा प्रकारजुना दरनवीन दर
देशी मद्य७० रुपये८० रुपये
महाराष्ट्र मेड लिकरनवीन प्रकार१४८ रुपये
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य१२० ते १५० रुपये२०५ रुपये
विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड३३० रुपये३६० रुपये

परवाना शुल्कात किती झाली वाढ?

विविध सीलबंद विदेशी मद्य विक्री परवाना (एफएल-२) व परवाना कक्ष हॉटेल/रेस्टॉरंट परवाना (एफएल-३) करार करून भाडेतत्त्वावर चालवता येईल. त्याकरिता वार्षिक लायसन्ससाठी अनुक्रमे १५ टक्के व १० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.

यापूर्वी दरवाढ कधी?

यापूर्वी २०२२ मध्ये देशी दारूच्या दरात वाढ झाली होती. मात्र, विदेशीच्या दरात २०११ पासून वाढ झाली नव्हती. त्यामुळे १४ वर्षानंतर ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

(टीप : यामध्ये केवळ शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 11-06-2025