पाकिस्तानचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठा सन्मान!

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काहीतरी वेगळंच राजकारण करत असल्याचं समोर येतंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये दणदणीत पराभव पत्करलेल्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अमेरिकेने 250 व्या आर्मी डे परेडसाठी निमंत्रण दिले आहे.

मुनीर 12 जून रोजी अमेरिकेत दाखल होणार असून, 14 जून रोजी होणाऱ्या समारंभात ते सहभागी होणार आहेत.

सीएनएन-टीव्ही 18 च्या वृत्तानुसार, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, असीम मुनीर यांच्याशी भेटीत भारत आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. तसेच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने 6 आणि 7 मे रोजी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर अयशस्वी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 10 मे 2025 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीवर सहमती करण्यात आली.

भारत-पाकमध्ये युद्धबंदी केल्याचा ट्रम्प यांचा दावा

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये मध्यस्ती करून दोन्ही देशामध्ये युद्धबंदी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी हा दावा अनेकदा केला आहे. भारताकडून हा दावा नाकारण्यात आला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र ट्रम्प यांच्या दाव्यावर कोणतेही भाष्य केलं नाही.

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांना ठार केले होते. त्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. भारताने 6-7 मे रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि अचूक हल्ले करून पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

भारताच्या विरोधानंतरही पाकिस्तानकडे मदतीचा ओघ

एकीकडे पाकिस्तान सातत्याने भारतामध्ये दहशदवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय संस्था या पाकिस्तानला मदत देत असल्याचं चित्र आहे. भारताने विरोध करुनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अब्जावधी डॉलर्सचे कर्ज पाकिस्तानला दिले. त्यामध्ये अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरली. दुसरीकडे आशियाई विकास बँकेनेही पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे कर्ज दिले.

पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष

दहशतवादाचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध असणारा पाकिस्तान आता संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्षपद असणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य असतात. त्यामध्ये 5 स्थायी सदस्य (अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, युनायटेड किंगडम) आणि 10 अस्थायी सदस्य असतात. अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी होते. 2025 मध्ये पाकिस्तान अस्थायी सदस्य म्हणून सुरक्षा परिषदेत सामील झाला आहे. त्यामुळे त्यांना परिषदेच्या विविध समित्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:55 11-06-2025