देवरुख : चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, देवरुख शहरातील नळपाणी योजनेसाठी तब्बल ४८ कोटी ८७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. महायुती सरकारच्या सहयोगाने ही योजना देवरुखवासीयांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.
आ. निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, नगरविकास सचिव गोविंदराज, उपसचिव श्रीकांत अंडगे, सचिन सहस्त्रबुद्धे, कक्ष अधिकारी गजानन आलेवाड, तसेच देवरुख नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन विसपुते यांचे विशेष आभार मानले.
देवरुखवासीयांना अनेक वर्षे भेडसावत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेमुळे शहरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ व २४ तास पाणीपुरवठा होईल, असे निकम यांनी सांगितले. तसेच देवरुखमधील आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही या योजनेसाठी सहकार्य केले, त्यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
नादुरुस्त पाईपलाईनचा प्रश्न सुटणार
या योजनेसाठी धरणांची उंची वाढवणे, नवीन साठवण टाक्या उभारणे व सर्व पाईप लाईन नवीन पुढील १०० वर्षांचा विचार करून उभारण्यात येणार आहे. सध्या वारंवार पाणी योजनेतील बिघाड होत असल्याने प्रतिदिनी पाणी देण्यास विस्कळीतपणा येतो. या योजनेमुळे नादुरुस्त पाईप लाईनचा प्रश्नच सुटणार आहे. लवकरच या योजनेच्या कामाचा प्रारंभ व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:43 PM 14/Oct/2024









