दापोली : दापोली तालुक्यातील हर्णे बायपास रोडवर, अगस्त्य हॉटेलजवळ बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात चार जण जखमी झाले. भरधाव वेगात आलेल्या एका पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या स्कोडा रॅपिड गाडीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हर्णे बायपास रोडवर, अगस्त्य हॉटेलजवळ, मुरडी येथील १९ वर्षीय आकाश अशोक चव्हाण हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन (एम.एच.०६ बी.डब्लु ५१६०) भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता. याचवेळी समोरून येणाऱ्या श्रुती लक्ष्मण कुमठेकर (वय २८, रा. काशीमीरा मिरारोड ईस्ट, ठाणे) यांच्या ताब्यातील स्कोडा रॅपिड वाहन (क्र. एम.एच.०२ सी.पी.७३५९) ला या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.
या अपघातात स्कोडा रॅपिडमधील चार प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये श्रुती लक्ष्मण कुमठेकर (वय २८, रा. मुंबई), नील शिरवाडकर (वय १७, रा. नवी मुंबई), अदिती जय नागवेकर (वय १५, रा. श्रीवर्धन, जि. रायगड) आणि जुही नागवेकर (वय २२, रा. श्रीवर्धन, जि. रायगड) यांचा समावेश आहे. अपघातानंतर तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी, श्रुती लक्ष्मण कुमठेकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी आकाश अशोक चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ११/०६/२०२५ रोजी सायंकाळी ७.३७ वाजता दाखल झालेल्या या गुन्ह्याचा क्रमांक ११०/२०२५ असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५ (अ), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 12-06-2025














