देवरुखात राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे ३६ वे राज्य अधिवेशन १५ जून रोजी

देवरुख : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे ३६ वे एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन कोकण विभागात प्रथमच १५ जून रोजी सकाळी ११ वा. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात येथे संपन्न होणार आहे.

या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री ना. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरुख नगरीत होत आहे.

शिक्षण संस्थांचे संघटन मजबूत करण्यासाठी, शिक्षण संस्थांच्या कार्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना सोबत घेऊन शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे अधिवेशन मैलाचा दगड ठरणार आहे. महामंडळाच्या मागील सर्व अधिवेशनातून शैक्षणिक व विधायक कामाची श्रृंखला निर्माण होत गेली. ती श्रृंखला मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या अधिवेशनात संच मान्यता, कर्मचारी भरती, वेतनेतर अनुदान, टप्पा अनुदान, महाविद्यालय अनुदान, ११ वी ऑनलाईन प्रवेश पध्दत आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा व ठराव करून शासनाला सादर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मराठी भाषा संवर्धन व प्रसार या विषयावरही चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक व देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 12/Jun/2025