रत्नागिरी, १२ जून २०२५ : रत्नागिरी नगरपरिषदेच्या कथित गैरकारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) येत्या शुक्रवारी, १३ जून रोजी दुपारी १ वाजता ‘गैरकारभाराची वरात नगरपरिषदेच्या दारात’ या नावाने धडक मोर्चा काढणार आहे. नगरपरिषदेतील वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे शहरात निर्माण झालेल्या समस्यांवर मनसेने या मोर्चाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, महेंद्र गुळेकर आणि शहराध्यक्ष बाबय भाटकर यांनी नवीन मुख्याधिकारी गारवे यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रत्नागिरी शहरातील दुर्दशा एका प्रेझेंटेशनद्वारे दाखवण्याची तयारी दर्शवली होती. मुख्याधिकारी बदलत असले तरी प्रत्येक विभागाचे अधिकारी स्थानिक असल्याने आणि अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने त्यांना शहरातील समस्यांची कल्पना असूनही ते दुर्लक्ष करत असल्याचे मनसेने म्हटले होते. मुख्याधिकारी महोदय यांनी लवकरच वेळ देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अनेक दिवस उलटूनही त्यांना वेळ मिळाला नाही, असा मनसेचा आरोप आहे. दरम्यान, मनसेने ज्या गैरसोयी दाखवण्याची तयारी केली होती, त्या आता प्रत्यक्षात शहरात दिसू लागल्या आहेत.
मनसेच्या मते, शहरातील अंतर्गत भागातील रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. गटारांची बांधकामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना ती अपूर्ण आहेत आणि अजूनही त्यांचे काम सुरू आहे. नगरपरिषदेतील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्याचा दावा मनसेने केला आहे.
मनसेने दिलेल्या पत्रात असेही नमूद केले आहे की, जिल्ह्याचे पालकमंत्री विकासकामांसाठी आग्रही असताना आणि निधीची कोणतीही कमतरता नसतानाही अधिकारी आपली नियोजित कामे पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे सामान्य जनतेमध्ये रोष निर्माण होणे स्वाभाविक आहे.
याच पार्श्वभूमीवर, करदात्या सामान्य जनतेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी, १३ जून रोजी दुपारी १ वाजता हा धडक मोर्चा काढणार आहे. शहर सचिव गौरव चव्हाण यांनी करदात्या आणि जागृत नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन आपला रोष व्यक्त करावा असे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 12-06-2025














