रत्नागिरी, १२ जून २०२५ : रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी नवानगर येथे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप असून, केवळ चालकांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळबादेवी नवानगर येथील वळणावर हा अपघात घडला. पावसामुळे रस्त्यावर माती आल्याने रस्ता निसरडा झाला होता, त्यामुळे चालकांना वळणाचा अंदाज घेण्यास अडचण आल्याने ही धडक झाल्याचे सांगितले जात आहे.
या अपघातात, एक बस रत्नागिरीच्या दिशेने जात होती. ही बस शहरी विभागाची होती. तर दुसरी बस ग्रामीण विभागाची असून, ती गणपतीपुळेच्या दिशेने जात होती. दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाल्याने मोठे नुकसान झाले असले तरी, योग्य खबरदारी घेतल्यामुळे आणि सुदैवाने प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दोन्ही बसचालकांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील कार्यवाही करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 12-06-2025














