रत्नागिरी मनोरुग्णालयात धक्कादायक प्रकार : मानसिक रुग्णाला मारहाण, चेहरा फ्रॅक्चर!

रत्नागिरी, ११ जून २०२५ : रत्नागिरी शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात एका मानसिक रुग्णाला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत २३ वर्षीय तरुणाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील राजीवडा नाका येथील कौशल्य प्लाझा येथे राहणाऱ्या शरीफा मुनाफ फणसोपकर (वय ४५) यांचा मुलगा मन्नान मुनाफ फणसोपकर (वय २३) हा मानसिक उपचारासाठी रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल होता. ६ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्यापूर्वी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मन्नानला मारहाण केली.

या घटनेमुळे मन्नानला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

शरीफा फणसोपकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीच्या चौकशीत मन्नानच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर, ११ जून २०२५ रोजी सायंकाळी ७.५३ वाजता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक २४७/२०२५ असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(१), (२) आणि ११५ (२) प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 12-06-2025