चिपळूण : जिल्ह्यातील रास्त धान्य दुकानांमधून जूनसह जुलै व ऑगस्ट असे तीन महिन्यांचे धान्य एकदाच मिळत आहे. एकावेळी धान्य पॉस मशीनवर वाटपास उपलब्ध करून देण्याची जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक, मालक संघटनेची मागणी जिल्हा पुरवठा विभागाने पूर्ण केल्याने वाटपाचा मार्ग सुकर झाला आहे; मात्र थकीत कमिशन अद्यापही न मिळाल्यामुळे दुकानदारांमध्ये नाराजी आहे.
पावसाचा वाढता जोर, पूर येण्याची शक्यता अशा अनेक कारणांमुळे धान्य खराब होण्याची शक्यता लक्षात घेता तसे होऊ नये म्हणून यावर्षी जून महिन्यातच पुढील दोन अशा तीन महिन्याचे धान्य एकदाच वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे; मात्र, तीन महिन्याचे धान्य दुकानात ठेवण्यास जागा अपुरी आहे. एक-दोन महिन्यासाठी जवळपास जागा भाड्याने घेणे दुकानदारांना परवडणारे नाही.
त्यामुळे दुकानदारांना टप्पाटप्प्याने धान्यपुरवठा व्हावा व जूनचे धान्य वाटपाबरोबरच जुलै व ऑगस्टचे धान्य पॉस मशिनवर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेने पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्याकडे केली होती. त्यानुसार या दोन्ही मागण्या मान्य झाल्याने उपलब्ध धान्यानुसार तीन महिन्याचे धान्य शिधापत्रिकाधारकांना दिले जात आहे. सध्या पाऊस कमी असल्याने व एकदाच तीन महिन्याचे धान्य मिळत असल्याने शिधापत्रिकाधारक रेशन दुकानांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दुकानदारांना धान्यवाटपाचे कमिशन मिळालेले नाही. तरीही एकावेळी तीन महिन्याची धान्यवाटपाची जबाबदारी त्यांनी विनातक्रार घेतली आहे. सध्या शेतीचा हंगाम आहे. त्यातच मुलांच्या शाळाही सुरू होणार आहेत. त्यामुळे हा खर्च कोठून करावा, असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे शासनाने थकीत कमिशन तातडीने दुकानदारांच्या खात्यात जमा करावे. – अशोक कदम, अध्यक्ष, जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक, मालक संघटना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 12/Jun/2025














