दापोली, १२ जून २०२५ : दापोली येथे विद्यापीठाच्या अधिकृत ईमेल आयडीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून, अज्ञात हॅकरने तब्बल ११ लाख ९४ हजार ९३३ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २ जून ते ५ जून २०२५ दरम्यान घडली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. धनश्री दीपक सामंत (वय ५४, रा. भागवत हॉस्पिटलजवळ, आनंदवन, जालगाव, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २ जून २०२५ रोजी दुपारी २.५० ते ५ जून २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजण्याच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने विद्यापीठाचा अधिकृत ईमेल आयडी ac1dbskkv@rediffmail.com मध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला.
हॅकरने मेल आयडीमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यातील बँकेच्या ईमेल आयडीमध्ये बदल केले. त्यानंतर, ईमेलमधील एक्सेल शीटमध्ये फेरफार करून त्यामध्ये १२ निवृत्तीवेतनधारकांचे मूळ खाते नंबर बदलून दुसरे खाते नंबर टाकले. ही बनावट एक्सेल शीट एसबीआय बँक दापोली यांच्या sbi.01047@sbi.co.in या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, ही फसवणूक केल्यानंतर हॅकरने मूळ मेल डिलिट करून टाकला.
या बनावट एक्सेल शीटच्या आधारे विद्यापीठाच्या १२ निवृत्तीवेतनधारकांची एकूण ११ लाख ९४ हजार ९३३ रुपये इतकी रक्कम बदललेल्या १२ खात्यांमध्ये वर्ग करून फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना ११ जून २०२५ रोजी रात्री ११.२६ वाजता पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा क्रमांक १११/२०२५ असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६, ६६(सी), ६६(डी) तसेच बी.एन.एस कलम ३१८(२)(४), ३१९(२), ३०३(२) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस या सायबर फसवणुकीचा सखोल तपास करत असून, हॅकर्सचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 12-06-2025














