रत्नागिरी : जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व, मॉन्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांकडून नांगरणी, पेरण्याच्या कामास वेग आला आहे. कोणी बैलाद्वारे तर कोणी यांत्रिकाच्या साहाय्याने नांगरणी, पेरणी करत आहेत. आतापर्यंत २५४१. ७६ हेक्टर क्षेत्रावर एकूण ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या दापोली, चिपळूणमध्ये झाल्या आहेत. सर्वात कमी लांजा, गुहागर या तालुक्यात झाल्या आहेत.
रत्नागिरीसह राज्यात मॉन्सूनपूर्वीचा पाऊस आठ दिवसांपूर्वीच आला. पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले. आतापर्यंत एवढा पाऊस झाला नाही एवढा विक्रमी पाऊस मे महिन्यात झाला आहे;
मात्र मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. पुन्हा एकदा कडक उन्हामुळे रत्नागिरीकर हैराण झाले आहेत तसेच दुसरीकडे पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील कामे करण्यास गती दिली आहे. यात नाचणीच्या पेरण्यासाठी नांगरणी करण्यात येत आहे. काहीजण पारंपरिक पद्धतीने बैलाने नांगरणी, पेरणी करत आहेत. काहीजण यांत्रिकी मशीनचा वापर करून नांगरणी करत आहेत. आता लवकरच मृग नक्षत्राचा पाऊस पडणार असल्यामुळे खऱ्याअथनि बळीराजाकडून भातपेरणीच्या कामास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने आता भातपेरणी कशी करावी, असा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. यामुळे बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:09 PM 12/Jun/2025














