नवी दिल्ली : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात होणाऱ्या विलंबासह त्यांच्या अन्य समस्यांकडे, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. “पंतप्रधान मोदींनी अनुसूचित जाती व जमातीच्या, ओबीसी तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत,” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
“दलित, अनुसूचित जाती-जमाती, अतिमागास, ‘ओबीसी’ व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची अवस्था दयनीय आहे, मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळेही या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत,” असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. अलीकडेच झालेल्या बिहार दौऱ्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी म्हटले, की मागासवर्गीय समुदायांमधून येणाऱ्या ९० टक्के विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होतो आहे.
ही स्थिती बिहारपुरता मर्यादित नसून देशभरात अशीच अवस्था आहे. त्यामुळे ही स्थिती दूर करण्यासाठी सरकारने यात लक्ष घालावे, अशी मागणी राहुल यांनी केली आहे. “अनुसूचित जाती, जमाती, दलित, आर्थिक मागास, ओबीसी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचे लेखापरिक्षण करून त्यांना मूलभूत सुविधा पुरविल्या जाव्यात. त्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी आणि या रकमेत वाढही केली जावी. ” अशी मागणीही राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 12/Jun/2025














