राजापूर, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओझर ते ओणी रस्त्यावर तिवरे गावाजवळ बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात श्रीमती अमिना मन्सूर मापारी (रा. ओझर) या जखमी झाल्या आहेत. ही घटना भर दिवसा घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री मन्सूर अकबर मापारी हे त्यांची पत्नी अमिना आणि मुलासह स्वतःच्या दुचाकीवरून राजापूरकडे जात होते. मौजे तिवरे खरब या ठिकाणी येताच, रस्त्यात अचानक बिबट्याने श्रीमती अमिना मन्सूर मापारी यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात अमिना यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याच्या खालच्या बाजूला बिबट्याची नखे लागली.
हल्ला झाल्यानंतर तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अमिना मापारी यांची विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदवले. तसेच, वनपाल राजापूर जयराम बावधने आणि वनरक्षक कुंभार नितेश गुरव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 12-06-2025














