Air India plane crashes in Ahmedabad: गुजरातच्याअहमदाबादमध्ये एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. यात अनेक जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरला असून या घटनेची भयावह दृश्य आता समोर येऊ लागली आहेत. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरात रहिवासी भागावर हे विमान कोसळल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे दुर्घटनाग्रस्त भागातील काही इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. तर परिसरातील वाहनं देखील जळून खाक झाली आहेत. वाहनांचे तर फक्त सांगाडे शिल्लक राहिलेले दिसत आहेत.
एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर ७८७ हे विमान बरंच मोठं विमान आहे. ज्याची प्रवासी क्षमता २४२ इतकी आहे. त्यात हे विमान अहमदाबाद ते लंडन असा थेट प्रवास करणारं होतं. त्यामुळे विमानाच्या इंधन टाक्या देखील पूर्णपणे भरलेल्या होत्या. इंधन टाक्या भरलेल्या असल्यानं अपघाताची तीव्रता वाढल्याचं दिसून येत आहे. विमान खाली कोसळताच आगीच्या ज्वाळा पाहायला मिळाल्या. त्यानंतर विमानाचा फक्त मलबा शिल्लक राहिल्याचा दिसून येत आहे.
प्रवासी विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती रुग्णालयाची इमारत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची दाट शक्यता आहे. परिसरात सर्वत्र धुराचे लोट असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:25 12-06-2025














