रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर बावनदीसह आंजणारी आणि वेरळ येथे गतिरोधक बसवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, अपघात निवारण समितीच्या बैठकीत त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे ती नव्याने अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासंदर्भात प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. नुकताच बावनदी येथे एका गॅसवाहू टँकरने प्रशिक्षणासाठी निघालेल्या शिक्षकांच्या मिनिबसला टक्कर दिली आणि या अपघातात ३० जण जखमी झाले. या अपघातानंतर आता बावनदी परिसरात सतत होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. निवळी परिसरातील कोकजेवठार या ठिकाणावरून सुरू होणारा तीव्र उतार आणि वळण यामुळे कोकजेवठारपासून खाली येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असतो.
त्यामुळे या परिसरात वाहनांचा ताबा सुटतो आणि अपघात होतो. त्यामुळे या परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आली आहे. बावनदीप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी व वेरळ येथेही अपघाताचे प्रमाण जास्त आहे. बावनदीप्रमाणेच मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी व वेरळ येथेही अपघाताचे प्रमाण जास्त आहे आणि येथेही गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अपघात निवारण समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणार असल्याचेही सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:13 PM 13/Jun/2025













