चिपळूण : चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुपुत्रवधू आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर अपर्णा महाडिक (वय ३५) यांचे गुरुवारी गुजरातमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताने कोकणच्या मातीतून आकाशात भरारी घेणारी एक कर्तव्यनिष्ठ कन्या अनपेक्षितपणे हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत. अमोल महाडिक हे देखील एअर इंडियामध्येच कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अपर्णा एअर इंडियाच्या सेवेत रुजू होत्या आणि गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या विमान अपघातात त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
अपर्णा यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर, नातेवाईकांवर आणि सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांची विनम्रता, समजूतदारपणा आणि व्यावसायिकता या गुणांसाठी त्या परिचित होत्या. एका धडाडीच्या महिलेचे असे अचानक जाणे हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणासाठी धक्कादायक ठरले आहे.
धामेली गावातही या बातमीने शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले आहे. अपर्णा यांच्या अंत्यविधीची माहिती नातेवाईकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
या दुर्दैवी घटनेवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत म्हटले, “अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार, कर्तबगार महिला गमावली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.”
हा अपघात केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणसाठीच एक मोठी, धक्कादायक घटना ठरली आहे. अपर्णा महाडिक यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 13-06-2025














