राजापूर : राजापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आणि प्रसूतीदरम्यान महिलेला झालेल्या गंभीर दुखापतीबद्दल दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० मार्च २०२४ रोजी पहाटे ३.३० ते १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८.०० च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजेश दीपक रायबागकर (वय ३६, रा. पाचल बाजारपेठ, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तेजेश हे एस.टी. महामंडळ, राजापूर आगारात नोकरी करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ३० मार्च २०२४ रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांची पत्नी तृप्ती तेजेश रायबागकर यांना प्रसूतीसाठी रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फिर्यादीनुसार, डॉ. डवरी यांनी तृप्ती रायबागकर यांची गंभीर परिस्थिती पाहूनही त्यांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले नाही आणि निष्काळजीपणा दाखवला. तसेच सायंकाळपर्यंत त्यांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयातच थांबवून ठेवले. डॉ. मेस्त्री, जे ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे प्रमुख स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत, ते २४ तास रुग्णालयात हजर नव्हते. जेव्हा तृप्ती रायबागकर यांना तातडीच्या उपचाराची गरज होती, तेव्हा डॉ. मेस्त्री यांनी त्यांना शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे रेफर करण्याऐवजी दिशाभूल करून स्वतःच्या खाजगी वृंदावन रुग्णालयात शासकीय रुग्णवाहिकेचा गैरवापर करून दाखल केले.
याव्यतिरिक्त, फिर्यादीने नमूद केले आहे की, नवजात बालकाला रत्नागिरी येथे नेताना ऑक्सिजन न लावता नेण्यात आले. रत्नागिरी येथील डॉ. सांघवीकर यांनी नवजात बालकाला कोल्हापूर येथे नेण्यास सांगितले. त्यानुसार, प्रथम साईस्पर्श हॉस्पिटल आणि त्यानंतर सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
डॉ. मेस्त्री आणि डॉ. डवरी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे फिर्यादीच्या पत्नीला गर्भाशय काढावे लागल्याचे आणि नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी गुरनं. ११६/२०२५ भा.दं.वि. कलम ३०४(अ), ३३८, ३४ अन्वये डॉ. मेस्त्री (वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, नेमणूक-ग्रामीण रुग्णालय, रायपाटण) आणि डॉ. डवरी (वैद्यकीय अधिकारी, नेमणूक-ग्रामीण रुग्णालय, रायपाटण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 13-06-2025














