चिपळूण : कोयना अवजलाच्या पाण्यावर पांढरा तवंग..

चिपळूण : पिंपळी येथून वाहणाऱ्या कोयना अवजलच्या पाण्यावर काल सायंकाळी पांढरा तवंग आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाणे खडपोली एमआयडीसीतील कंपनीतील पाणी या अवजलमध्ये सोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र हे पाणी नक्की कोणत्या कंपनीने सोडले हे काल सायंकाळीपर्यंत स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हे पाणी नक्की कोणी सोडले याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. पिंपळी येथे काल सायंकाळी पाण्यावर पांढरा तवंग आल्यानंतर चिपळूण पालिकेच्या पाणी विभागानेही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. कोयना प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतर सोडण्यात येणारे अवजल वाशिष्टी नदीला मिळते. चिपळूण मध्ये हे पाणी पालिका उचलते आणि नागरिकांना पिण्यासाठी देते. काल सायंकाळी आठ वाजता पालिका पाणी उचलणार होते. तत्पूर्वी ही घटना समजल्यानंतर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पालिकेने अवजलचे पाणी न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या टाक्यांमध्ये पुरेसे पाणी आहे. ते नागरिकांना दिले जाणार आहे त्यामुळे नागरिकांना भीतीचे कारण नाही. मात्र हा प्रकार मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे.

दूषित पाणी उचलणार नाही

वाशिष्ठीतील त्या प्रकाराबाबत माहिती देताना पालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख रोहित खाडे म्हणाले, आम्ही हे दूषित पाणी उचलणार नाही. यापूर्वी असा प्रकार घडला होता त्यानंतर आम्ही सर्व प्रकारच्या खबरदारी घेत आहोत. वाशिष्ठीचे पाणी उचलण्यापूर्वी आम्ही जॅकवेलच्या ठिकाणचे फोटो कर्मचाऱ्यांकडून मागवतो. त्यानंतरच पाणी उचलतो. यापूर्वी असा प्रकार घडला होता तेव्हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पोलीस ठाणे यांना पत्रव्यवहार करून अशाप्रकारे पाणी सोडवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना केली होती. कारखानदारांशीही पत्रव्यवहार केला होता. आजचा प्रकार गंभीर आहे. आम्ही आमच्या स्तरावर उपयोजना करत आहोत. हे पाणी अरबी समुद्राला वाहून गेल्यानंतरच वाशिष्ठीचे पाणी उचलले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 13/Jun/2025