लांजा : शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, दिव्यांगांची पेन्शन सहा हजार झालीच पाहिजे, अशा घोषणांनी दिव्यांग बांधवांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांचे अमरावतीमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला लांज्यात दिव्यांग बांधवांनी एकजुटीने जोरदार पाठिंबा दिला.
गेल्या पाच दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बुधवारी कडू यांची प्रकृती बिघडल्याने हे आंदोलन चिघळले. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी १२ जूनला सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरात घोषणा देत तहसीलदार प्रियंका ढोले यांना निवेदन देण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून दिव्यांग बांधवांसाठी माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे अमरावती येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाची दखल सरकारच्यावतीने घेण्यात आलेली नाही. कडू यांची प्रकृती बिघडल्याने दिव्यांग बाधवांमधून सरकारच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा कडू यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून, सरकारने दिव्यांगांच्या तीव्र भावना समजून घेत तातडीने आंदोलनाची दखल घ्यावी. तहसीलदारांना निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, लांजा तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश लांजेकर, शिवसेना ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लांजा तालुका युवक अध्यक्ष बाबा धावणे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 13/Jun/2025














