मुंबई, १३ जून २०२५ : जिजाऊ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत हे देखील उपस्थित होते. या पक्षप्रवेशाला मास्टरस्ट्रोक मानले जात असून, यामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऐतिहासिक पक्षप्रवेश आणि उपनेतेपदाची जबाबदारी
या ऐतिहासिक क्षणी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला. निलेश सांबरे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक बळकट झाली असून, शिंदे साहेबांचे नेतृत्व अधिक प्रभावी व व्यापक झाले आहे. विशेष म्हणजे, या प्रवेशावेळी निलेश सांबरे यांना शिवसेनेचे उपनेतेपद देखील देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली आहे.
उदय सामंत यांचा राजकीय मास्टरस्ट्रोक
राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा आहे. निलेश सांबरे यांच्या भगवान सांबरे रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात ना. उदय सामंत यांचे अनेक विरोधक व्यासपीठावर एकत्र आले होते. निलेश सांबरे यांना ना. उदय सामंत यांच्या विरोधात उतरवण्याचे मनसुबे आखले जात होते. मात्र, राजकीय आखाड्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या उदय सामंत यांनी हा मास्टरस्ट्रोक मारत आपल्या विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवले. उदय सामंत यांनी निलेश सांबरे यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत आणून, त्यांना उपनेतेपद मिळवून दिले. यातून भविष्यात कोकणात निलेश सांबरे यांना सोबत घेऊन शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न ना. उदय सामंत यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे. निलेश सांबरे यांचा पक्षप्रवेश हा ना. उदय सामंत यांच्या विरोधकांना एक मोठा धक्का मानला जात आहे.
सामाजिक कार्याचे योगदान आणि शिवसेनेची वाढ
निलेश सांबरे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे समाजात त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचा विस्तार आणि लोकसंपर्क अधिक बळकट होईल, असे ना. उदयजी सामंत यांनी यावेळी म्हटले. हे परिवर्तनाचे प्रतीक असून, यामुळे शिवसेनेला कोकणात अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 13-06-2025














