संगमेश्वर : दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली असूनही त्यांना या जिल्ह्यात नोकऱ्या मिळत नाहीत. हे येथील दोन मंत्री व आमदारांचे अपयश आहे, असे स्पष्ट मत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी व्यक्त केले. कुणबी समाज संघाच्या आंबवपोंक्षे येथील ग्रामशाखेतर्फे सरंद येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला. त्यावेळी सुरेश भायजे बोलत होते.
ते म्हणाले, “पवित्र पोर्टलमधून जी १४४६ शिक्षक भरती झाली त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त १४ मुलांनाच नोकऱ्या मिळाल्या. ९९ टक्के शिक्षक भरती ही परजिल्ह्यातील झाली आहे. त्याबाबत स्थानिकांमध्ये असंतोष आहे. सर्व लोकप्रतिनिधींना याबाबत चौकशी होऊन भ्रष्टाचार उघड करण्याबाबतची निवेदने देण्यात आली; मात्र एकाही लोकप्रतिनिधीने अधिवेशनात हा प्रश्न मांडलेला नाही.
याप्रसंगी एमपीएससीमध्ये अठराव्या रँकने उत्तीर्ण झालेल्या रोहन शिगवण, ९९ टक्के गुण मिळवलेली आर्या पडये यांचा गौरव करण्यात आला. दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. तसेच वयोवृद्ध समाजसेवक शंकर कवळकर, कासे येथील उद्योजक अर्जुन गोताड, धामापूरचे माजी सरपंच सोनू भायजे, कोंडीवरेचे माजी सरपंच कृष्णा भुवड, आरवलीचे कृष्णा लांबे, भोसले, माखजनचे अशोक तांबे, करजुवेचे दत्ताराम गेल्ये, शांताराम जाधव आदींचा उत्कृष्ट सामाजिक कामगिरीबाबत मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 13/Jun/2025














