साखरपा : साखरपा महावितरणचा कारभार सुधारण्याची काही चिन्हं नाहीत. सोमवारी दिवसभर दुरुस्ती देखभालीसाठी पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा आठ तास बंद ठेवल्यावरही लगेच काही तासांतच तीनवेळा बिघाड झाल्यामुळे मंगळवारची पहाट कनकाडी गामस्थांना अंधारात काढावी लागली. काल सकाळी पुन्हा तोच प्रकार घडल्यामुळे चार तास खंडित विद्युत पुरवठ्याचा सामना ग्रामस्थांना करावा लागला.
सोमवारी साखरपा महावितरणच्या अखत्यारित येणाऱ्या गावांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवला होता. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत म्हणजेच आठ तास हा विद्युत पुरवठा बंद ठेवला होता; पण त्यानंतर लगेचच रात्री तीनवेळा पुन्हा बिघाड निर्माण झाला आणि काही गावांना अंधारात रात्र काढावी लागली. रात्री अकरा ते साडेअकरा या अर्ध्या तासात मेढे, दाभोळे, कनकाडी आदी गावांमध्ये विद्युतपुरवठा खंडित झाला.
दोनच्या सुमारास काही काळ हा विद्युत पुरवठा खंडित झाला. मंगळवारी पहाटे चार वाजता मात्र कनकाडी येथे मोठा बिघाड निर्माण झाला आणि त्यामुळे विद्युत पुरवठा तब्बल सात तास पुन्हा खंडित झाला. गुरुवारी पुन्हा रात्रभरात दोन वेळा विद्युतपुरवठा काही काळासाठी खंडित होण्याचा प्रकार घडला. तसेच पहाटे पुन्हा चार वाजता विद्युत पुरवठा बंद झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 13/Jun/2025














