रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे कुटुंब दत्तक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली जनऔषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख व सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूजा रॉय व वरिष्ठ निवासी डॉ. अन्नेपु पूर्णा चंदू यांनी कुटुंब दत्तक कार्यक्रम व वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कुलकर्णी व आरोग्य सहाय्यक गणेश वाघ यांच्या वतीने शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीत आरोग्य शिबिरामध्ये सहकार्य करण्यात आले.
कुटुंब दत्तक कार्यक्रम हा नॅशनल मेडिकल कमिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वैद्यकीय शिक्षणात समुदायाशी प्रत्यक्ष सहभाग हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेला एक अभिनव उपक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत एमबीबीएस पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण व शहरी भागातील विशिष्ट कुटुंबे दत्तक घेऊन त्यांचे आरोग्य, सामाजिक व कौटुंबिक पैलू समजून घेऊन आरोग्य शिक्षण, सल्ला आणि प्राथमिक सेवा देणे अपेक्षित असते. त्याच उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
शिरगाव गावाची कुटुंब दत्तक कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थी पाच कुटुंब दत्तक घेणार आहे. या भेटीमध्ये रुग्णांची जीवनशैली, आहार स्वच्छता, माता व बाल आरोग्यविषयक निरीक्षण, दैनंदिन सवयी, व्यसनाधीनता, मानसिक आरोग्य अभ्यास, लसीकरण स्थिती तपासणी व सल्ला याबाबत गृहभेटीवेळी माहिती घेऊन रुग्णांना सहाय्य करण्यात येणार आहे.ग्रुप ग्रामपंचायतीत आयोजित केलेल्या या वैद्यकीय आरोग्य शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सहकार्य केले.कार्यक्रम सरपंच फरीदा काझी, ग्रामसेवक उल्हास कोळी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांच्या उपस्थितीत पार पडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 13-06-2025














