रत्नागिरी : जिंदल टर्मिनलचे कामबंदचे ग्रामस्थांना पत्र

रत्नागिरी : नांदिवडे लोकवस्तीमध्ये जिंदलकडून उभारण्यात येत असलेले गॅस टर्मिनलचे काम बंद असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थ आणि प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाने काम बंद करण्याचे आदेश देऊनही काल कंपनीकडून अंतर्गत काम सुरू होते. संतप्त ग्रामस्थांनी ते काल बंद पाडले. याबाबत ग्रामस्थ आणि प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.तालुक्यातील नांदिवडे येथे जिंदलकडून एलपी गॅस टर्मिनल उभारले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी गॅस लिकेज होऊन जवळपास ८०हून अधिक विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. त्यानंतर या ठिकाणी टर्मिनल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. लोकवस्तीत असल्याने त्यापासून होणारा धोका ओळखत याला सातत्याने ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. परवानगी नसतानाही नियम धाब्यावर बसवून याचे काम सुरू आहे. या संदर्भात ग्रामस्थांसह प्रहार जनशक्तीकडून आवाज उठवण्यात आला होता. काल गॅस टर्मिनल परिसरात कामकाज सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. ग्रामस्थांच्या हे लक्षात येताच काम बंद पाडले. काल प्रहार जनशक्तीसह ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.

या वेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व प्रहार जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांना टर्मिनलचे काम बंद असल्याचे लेखी पत्र दिले. हा विषय महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने अधिक माहितीसाठी त्या ठिकाणी संपर्क साधावा, असेही सूचित करण्यात आले आहे. या वेळी ग्रामस्थ रोहन सुर्वे, गुरूनाथ सुर्वे, विजय घवाळी, आरती सुर्वे, सिद्धी सुर्वे, सागर सुर्वे, संजय मिस्त्री, देवेश मिस्त्री, दर्शना सुर्वे, संपदा सुर्वे, प्रवीण सुर्वे व विकास सुर्वे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 13/Jun/2025