आचरा : देवगड तालुक्यातील मणचे गावात ‘Dumeril”s Black-headed Snake’ अर्थात ‘काळतोंड्या’ हा दुर्मीळ आणि लाजऱ्या स्वभावाचा साप नुकताच आढळून आला. या दुर्मीळ सापाच्या आढळामुळे वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मणचे गावातील व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ आढळून आला. त्यांना वन्यजीव निरीक्षणाची आवड आहे. साप दिसताच त्यांनी तत्काळ त्याचे व्हिडिओ व फोटो घेतले आणि योग्य ओळख पटविण्यासाठी चिंदर गावचे वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला. गोसावी यांनी या सापाची ‘काळतोंड्या’ अशी ओळख पटवली.
हा साप अंदाजे २५ ते ३० सेंटीमीटर लांबीचा असून, त्याच्या डोक्यावर काळ्या रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला काळतोंड्या असे म्हणतात. हा साप बिनविषारी असून स्वभावाने लाजरा आहे. त्याचा वावर मुख्यतः दाट जंगल व गवताळ भागांमध्ये असतो. पाली, सापसुरळी हे त्याचे खाद्य आहे. ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळा आढळून आलेली असून, याबाबतचे नियमित नोंदवहीकरण देखील अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे मणचे परिसरातील हा साप सिंधुदुर्गातील जैवविविधतेसाठी एक महत्त्वाची नोंद ठरते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 13/Jun/2025













