चिपळूण : चिपळूण ते कुंभार्ली घाटादरम्यान बांधलेल्या अनेक संरक्षक भिंतीच्या समोरील मातीचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे रस्ता मजबुतीकरण आणि अपघात टाळण्यासाठी बांधलेल्या या संरक्षण भिंती धोकादायक झाल्या आहेत. जुन्या भिंती पाडून नव्या भिंती बांधण्याचा प्रकार घाटात सुरू आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या भिंतीमुळे खरंच अपघात टाळतात का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
चिपळूण ते कऱ्हाड मार्गावर अनावश्यक ठिकाणी बांधलेल्या संरक्षक भिंती चर्चेचा विषय असताना आता धोकादायक संरक्षक भिंतीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पिंपळी गावापासून पुढे कुंभार्ली घाटापर्यंत अनेक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षक भिंती बांधल्या आहेत. वास्तविक या भिंती बांधण्याची मागणी कोणत्याही ग्रामपंचायतीने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीने केलेली नाही. ज्या ठिकाणी भिंती बांधल्या जात आहेत त्यातील बहुतांशी ठिकाणी कधी अपघात झाले नाहीत किंवा रस्ताही खचला नाही. रस्त्याला लागून ठेकेदाराने संरक्षण भिंती बांधल्या. रस्ता आणि संरक्षण भिंत यांच्या मध्यभागी दगड-मातीचा भराव करणे आवश्यक असते; मात्र ठेकेदाराने केवळ मातीचाच भराव केला तोही व्यवस्थित केला नाही. त्यामुळे पहिल्या पावसात अनेक संरक्षण भिंतीच्या समोरील माती वाहून गेली आहे.
या ठिकाणी वाहने रुतण्याचा आणि अपघात होण्याचा धोका आहे. ही गोष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्यानंतर नव्याने बांधलेल्या संरक्षण भिंतीसमोर अपघात टाळण्यासाठी काही ठिकाणी सिमेंटच्या पोतीमध्ये माती भरून ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी तर संरक्षक भिंतीचे सिमेंटचे बांधकाम उभे आहेत, त्या खालची माती वाहून गेली आहे. शिरगाव ब्राह्मणवाडी सोडल्यानंतर पुढे आणि मुंडे गावच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला अलीकडे संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीच्या समोरील आणि भिंतीच्या खालील मातीचा पूर्ण भराव वाहून गेला आहे. या ठिकाणी अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
१२ कोटींचा खर्च
चिपळूण-कराड मार्गावर पिंपळीपासून पुढे घाटरस्त्यापर्यंत संरक्षक भिंती बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १२ कोटींचा खर्च केला आहे. जुन्या भिंती पाडायच्या आणि नवीन भिंती बांधायच्या, असा प्रकार येथे सुरू आहे. ठेकेदार भिंती बांधतात; मात्र भिंतीचे काम दर्जात्मक झाले की, नाही किंवा पावसाळ्यात तेथे कोणतेही आपत्ती निर्माण होणार नाही, याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली पाहिजे.
ज्या ठिकाणी संरक्षण भिंती धोकादायक झाल्या आहेत तेथे उपाययोजना सुरू आहेत. कुंभार्ली घाटात उपाययोजना सुरू आहे. पावसाळ्यात कुठेही अपघात होणार नाही. याची काळजी आम्ही घेत आहोत. ठेकेदारांनी हलगर्जीपणा केला असेल, तर त्यांनाही सूचना करून त्यांच्याकडून संरक्षक भिंतींची दुरुस्ती करून घेऊ.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 13/Jun/2025














