चिपळूण : महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीत कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सापत्न वागणूक देत कोकणचा स्वाभिमान दुखावण्याचे प्रयत्न झाल्याने तिन्ही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे सामुदायिक राजीनामे देण्याचा निर्णय घेतला. यापुढे राज्य कार्यकारिणीशी कोणतीही बांधिलकी ठेवायची नाही, असा निर्णय चिपळूण येथे झालेल्या सभेत एकमताने घेण्यात आला. तसेच यावेळी कोकण प्रदेश संत गाडगेबाबा परीट-धोबी सेवा मंडळ या संघटनेची स्थापना करून प्रदेशाध्यक्षपदी कोकणचे ज्येष्ठ नेते शांताराम कदम यांची निवड करण्यात आली.
चिपळूण येथे कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ज्येष्ठ नेते शांताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे नेते दत्ताराम महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष नंदकुमार राक्षे, सिंधुदुर्ग अध्यक्ष दिलीप भालेकर, सचिव अनिल शिवडावकर, रायगड अध्यक्ष विलास तळेकर उपस्थित होते. कार्याध्यक्ष सुभाष कदम यांनी राज्य संघटनेकडून कोकणवर होत असलेल्या अन्यायाचा सविस्तर पाढा वाचला. यानंतर झालेल्या चर्चेत राज्य संघटनेशी संपर्क ठेवू नये. सर्वांनी आपल्या पदाचे सामुदायिक राजीनामे द्या व कोणत्याही बैठकीला किंवा कार्यक्रमाला कोणीहा जाऊ नये, असे सुचविले. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. यापुढे आपण कोकणाची स्वतंत्र संघटना बनवू व एकजुटीने काम करण्याचे ठरले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 13/Jun/2025














