चिपळूण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारीपदी प्रमोदकुमार शेंडगेंची नियुक्ती

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या शिक्षण विभागास गेल्या १३ वर्षांपासून नियमित गटशिक्षणाधिकारी मिळाला नव्हता. आता मात्र शिक्षण विभागाचा वनवास संपला आहे. सांगली येथील प्रमोदकुमार शेंडगे यांची चिपळूणला गटशिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा डोलारा मोठा आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या सुमारे १५ हजारइतकी आहे तर ८०० हून अधिक शिक्षक येथे कार्यरत आहेत. शिक्षकबदल्या असो व शिक्षकांचे प्रश्न, या ना त्या माध्यमातून येथील शिक्षण विभाग यापूर्वी नेहमीच चर्चेत असायचा; मात्र पंचायत समितीवर प्रशासक आल्यानंतर ते थांबले आहे. २०१२ च्या सुमारास तत्कालीन गटशिक्षणाधिकारी जोशी यांची बदली झाल्यानंतर चिपळूण पंचायत समितीला नियमित गटशिक्षणाधिकारी मिळालेला नाही. मध्यंतरी २०१८ च्या सुमारे एस. बी. पाटील यांनी ७ महिने नियमित गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांचीही बदली झाल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी येथे प्रभारी म्हणून काम केले.

याच शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या काही विस्तार अधिकाऱ्यांनी देखील प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले. तालुक्यात नवनवीन उपक्रम राबवताना त्यांनाही शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. सध्या डी. डी. इरनाक हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्या जागी सांगली येथून शेंडगे यांची नियुक्ती झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 13/Jun/2025