गुहागर : तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले अनेक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. यामुळे पंचक्रोशितील नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेले कित्येक दिवस वादळ, पाऊस नसतानादेखील येथील पंचक्रोशीतील गावांमध्ये सातत्याने रात्रीच्यावेळी वीजपुरवठा नेहमीच खंडित होतो. मात्र याकडे लक्ष देण्यास महावितरणला वेळ नसल्याचे दिसून येत आहे.
याबाबत नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्येदेखील महाविरणच्या या गलथान कारभाराचा विषय चांगलाच गाजला होता. ग्राहकांच्या समस्या ऐकण्यासाठी जर महावितरणचे अधिकारी हजर नसतील तर ग्राहकांनी करायचे काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला. दरम्यान, वीज बिल भरणा नसेल तर महावितरणचे हेच अधिकारी व कर्मचारी वीज जोडणी तोडण्यासाठी घरी येतात तर अनेकवेळा फोनवरून वीज बिल भरा नाहीतर वीजपुरवठा खंडीत करू, असा दमच ग्राहकांना देतात. मात्र ज्यावेळी विजेचा लपंडाव सुरू असतो त्यावेळी त्यावर तितक्याच तत्परतेने का पाहिले जात नाही असा सवालही सर्वसामान्य नागरिकांमधून आता केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 13/Jun/2025









