पत्रकारांच्या योजनांमधील जाचक अटी शिथिल करा : मराठी पत्रकार परिषदेची सरकारकडे मागणी

रत्नागिरी/प्रतिनिधी, शुक्रवार, १३ जून २०२५: पत्रकारांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांमधील जाचक अटी आणि नियमांमध्ये बदल करावेत, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सरकारकडे केली आहे. परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सरकारने या मागणीची दखल घेऊन काही सुधारणा करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचे आभार मानत, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरीच्या वतीने शुक्रवारी जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात विविध योजनेतील नियमांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

सन्मान योजनेत महत्त्वाच्या बदलांची मागणी
मराठी पत्रकार परिषदेने सन्मान योजनेसाठी वयाची अट ५८ वर्षे करावी आणि अनुभवाची अट २५ वर्षे करावी अशी मागणी केली आहे. सध्याची सलग तीस वर्षे सेवेची अट रद्द करण्याची मुख्य मागणी आहे. परिषदेनुसार, श्रमिक पत्रकारांना नोकरी बदलताना काही दिवसांचा खंड पडू शकतो, ज्यामुळे आयुष्यभर पत्रकारिता करणाऱ्यांचीही सलग ३० वर्षे सेवा पूर्ण होत नाही आणि अनेक पत्रकार योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे सलग सेवेची अट रद्द करून, एक वर्षापर्यंत खंड पडलेला असला तरी ती सलग सेवा गृहीत धरावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे विनाखंड, सलग ३० वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे आणि ज्यांचे वय ५८ वर्षे आहे, अशा पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणीही यात समाविष्ट आहे.

कागदपत्रांच्या अडचणींवर उपाययोजना हवी
महाराष्ट्रात असंख्य पत्रकारांकडे ३० वर्षांपूर्वीची कागदपत्रे उपलब्ध नाहीत, त्यामुळे ते योजनांपासून वंचित राहतात. अशा स्थितीत जिल्हा माहिती अधिकारी आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे शिफारसपत्र ग्राह्य धरावे, तसेच संबंधित पत्रकाराचे प्रतिज्ञापत्र घेतले जावे, अशी मागणी परिषदेने केली आहे. या अडचणीवर योग्य तो तोडगा काढणे आवश्यक आहे, अन्यथा खऱ्या पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे परिषदेने निवेदनात म्हटले आहे.

मुद्रक/प्रकाशक म्हणून नोंद असलेल्या पत्रकारांनाही लाभ द्या
अनेक साप्ताहिकांमध्ये प्रेस लाईनवर मालक, मुद्रक, संपादक, प्रकाशक म्हणून एकाच व्यक्तीचे नाव असते. मुद्रक अथवा प्रकाशक म्हणून नाव आहे म्हणजे तो पत्रकार अन्य व्यवसाय करतो असे नाही, ते केवळ सोयीसाठी असते. त्यामुळे अशा पत्रकारांनाही योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी परिषदेने केली आहे. याशिवाय, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीबाबतही सुधारणा करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोकण उपाध्यक्ष हेमंत वणजु, जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, राज्य अधिस्वीकृती सदस्य जान्हवी पाटील, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान, सतीश पालकर, जमीर खलफे, सचिन बोरकर, तन्मय दाते आदी उपस्थित होते. पत्रकारिता क्षेत्रातील बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी या बदलांची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 13-06-2025