‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ मांडवी किनारा प्लास्टिकच्या विळख्यात; स्वच्छतेअभावी पर्यटक-स्थानिक त्रस्त

रत्नागिरी, ता. १३ जून २०२५ : एकेकाळी ‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ म्हणून ओळखला जाणारा मांडवी समुद्रकिनारा सध्या प्लास्टिक कचरा आणि अन्य विविध प्रकारच्या साचलेल्या कचऱ्यामुळे अक्षरशः बकाल झाला आहे. किनाऱ्याच्या स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून, यामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे, तर स्थानिक रहिवाशांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेकडून तात्पुरती स्वच्छता केली जात असली तरी, कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पर्यटकांची वर्दळ, व्यावसायिकांचे नुकसान
मांडवी किनारा हे रत्नागिरी शहरातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे, जिथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. किनाऱ्यावर चार मोठी हॉटेल्स, भेळ, पाणीपुरी, कणीस, शहाळी विकणारे सुमारे २० विक्रेते, तसेच लहान मुलांसाठी पाळणे, घोडा गाडी आदी खेळाचे प्रकार असलेले व्यावसायिक आहेत. मात्र, किनाऱ्यावरील कचऱ्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी असाच कचरा साचल्यानंतर स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता केली होती, परंतु त्यानंतरही पालिकेकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे.

स्वच्छतेची जबाबदारी कोणाची? प्रश्न अनुत्तरित
मांडवीच्या पर्यटन विकासासाठी जेटीची सुधारणा आणि संरक्षक बंधाऱ्याचे बांधकाम यांसारखे प्रयत्न झाले असले तरी, किनारा स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मांडवी किनारा स्वच्छतेची जबाबदारी रत्नागिरी शहरातील एका नामवंत कंपनीकडे सीएसआर फंडातून खर्च करण्याच्या अटीवर दिली होती. त्यावेळी मांडवीत तसा फलकही लावण्यात आला होता आणि काही वर्षे नियमित सफाईसुद्धा झाली. मात्र, संरक्षक बंधाऱ्याच्या कामावेळी हा फलक काढून टाकण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी बदलले आणि कंपनीचे व्यवस्थापनही बदलले, त्यामुळे आता स्वच्छतेची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यटक आणि स्थानिक रत्नागिरीकरांना किनाऱ्यावर फिरणेही कठीण झाले आहे.

स्वच्छता यंत्रणा असूनही दुर्लक्ष
सर्वच किनाऱ्यांवर कचरा येत असतो, परंतु त्याची दररोज स्वच्छता होणे आवश्यक आहे. भाट्ये किनाऱ्यावर मशीनद्वारे स्वच्छता केली जाते; परंतु मांडवीसारख्या ठिकाणी मशीन येऊनही स्वच्छता झालेली नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या माध्यमातून हे मशीन चालवले पाहिजे; परंतु प्रशिक्षित चालक नसल्याने हे मशीन पालिकेतच धूळ खात पडून असल्याचे बोलले जात आहे.

या गंभीर समस्येवर रत्नागिरी नगरपालिकेने आणि संबंधित प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा ‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ ही ओळख पुसली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 13-06-2025