रत्नागिरी, १३ जून २०२५: रत्नागिरी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी आणि विविध जनहितार्थ मागण्यांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला कार्यकर्त्यांनी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढला. “अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगर परिषदेच्या दारात” अशा घोषणांनी रत्नागिरी शहर दुमदुमून गेले होते.
रत्नागिरीच्या जयस्तंभ येथून या मोर्चाला सुरुवात झाली. मनसेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या हातात मागण्यांचे फलक होते आणि त्या जोरदार घोषणाबाजी करत नगर परिषदेच्या दिशेने मार्गक्रमण करत होत्या.
मनसेच्या प्रमुख मागण्यांमध्ये महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे, सांडपाण्यामुळे होणारे समुद्राचे प्रदूषण तात्काळ थांबवणे आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन करणे या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. या मागण्यांकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यास भाग पाडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मनसेच्या या मोर्च्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या कामकाजावर आणि अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यातही असेच तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 13-06-2025














