संगमेश्वरमध्ये सर्पदंशाने कामगाराचा मृत्यू : डेरवणच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना घडली घटना

संगमेश्वर, १४ जून २०२५ : संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी आंबेड येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या एका २७ वर्षीय कामगाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १० जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भरत कांत (वय २७, रा. गुदावली, अस्तवन, जि. भरतपूर, राजस्थान) हा तरुण सध्या सोनगिरी आंबेड, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे रस्त्याच्या कामासाठी वास्तव्यास होता. ८ जून २०२५ रोजी रात्री जेवण करून झोपले असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला कोणत्यातरी सरपटणाऱ्या सापाने दंश केला.

सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच, त्याला तात्काळ प्रथमोपचारासाठी संगमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना, १० जून २०२५ रोजी पहाटे ५.३२ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी १३ मे २०२५ रोजी दुपारी १.३५ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक-१८/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 14-06-2025