आरवली : पावसाळ्यापूर्वी एप्रिल महिन्यात आरवली येथील मुंबई गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोड लगत बांधलेले गटार पहिल्याच पावसात तुटल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. सर्व्हिस रोडचे काम पावसाळ्यात हाती घेण्यात आल्याने तसेच वाहतुकीची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नसल्याने गरम पाण्याच्या कुंडाजवळ अपघाताची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी महामार्गला पडलेल्या भेगा रुंदावत चालल्याने वाहन चालकात भीतीचे वातावरण आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून कामाची गुणवत्ता नेहमीच चर्चेत राहिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते संगमेश्वर दरम्यान किंबहुना सर्वच काम निकृष्ट होत असल्याचा आरोप नेहमीच सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. परंतु याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात प्रशासनाने धन्य मानले. एप्रिल महिन्यात आरवली येथील सर्व्हिस रोडच्या गटाराचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या कामावर पाणी मारण्यात न आल्याने कामाच्या दर्जाबाबत तेव्हाच शंका उपस्थित करण्यात आली होती. या गटाराला तडे गेल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यावरही प्रशासनाने याकडे लक्ष देण्याचे जाणीवपूर्वक टाळले.
आता पावसाळा सुरु होताच येथील सर्व्हिस रोडचे गटार तुटण्यास सुरुवात होऊन गटाराला भगदाड पडले आहे. यामुळे बाजापेठेत येणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. तसेच वाहतूकिस धोका निर्माण झाला आहे.
येथील सर्व्हिस रोड काँक्रिटीकरण काम पाऊस सुरू झाल्यावर हाती घेतले आहे. त्यामुळे या बाजूने वाहतूक बंद करून दुसऱ्या बाजूने वळवल्याने गरम पाण्याच्या कुंडाजवळ महामार्गावर चिपळूण व रत्नागिरी बाजूने येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 14/Jun/2025














