दापोलीत विवाहितेची गळफास लावून आत्महत्या; जालगाव बर्वेवाडी येथील घटना

दापोली, १४ जून २०२५ : दापोली तालुक्यातील जालगाव बर्वेवाडी येथे काल, १३ जून २०२५ रोजी सकाळी एका २२ वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी पती घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन (वय २२, मूळ रा. नौडीहा, जि. छात्रा, झारखंड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पिंकीदेवी सध्या पतीसोबत जालगाव बर्वेवाडी, दापोली येथे वास्तव्यास होत्या. त्यांचे पती बुरोडी नाका येथे कामासाठी गेले होते. दुपारपर्यंत स्लॅपचे काम पूर्ण झाल्याने ते आराम करण्यासाठी घरी परतले.

घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार हाक मारूनही पत्नीने प्रतिसाद न दिल्याने पतीने खिडकीतून डोकावून पाहिले असता, पिंकीदेवीने घरातील लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.

हा प्रकार पाहून पतीने तात्काळ खिडकीचा दरवाजा जोर लावून उघडला आणि आत प्रवेश केला. त्यांनी तात्काळ पिंकीदेवीला खाली उतरवले. त्यानंतर घरमालक गणेश सकपाळ आणि वाडीतील इतर लोकांच्या मदतीने तिला तात्काळ दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पिंकीदेवीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात १३ जून २०२५ रोजी रात्री ८.३२ वाजता आमृ. क्रमांक-४३/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ नुसार आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या घटनेने जालगाव बर्वेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पिंकीदेवीने आत्महत्या का केली, याचा तपास दापोली पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 14-06-2025