‘कशेडी’तील जुन्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी दोन्ही बोगद्यातून पूर्णक्षमतेने वाहतूक खुली झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. कशेडी घाटातील जुन्या मार्गाकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. मार्गावर पडलेल्या भेगांमुळे दरडी कोसळण्याचा धोकाही कायम आहे. यामुळे वाहनचालकांची सुरक्षितता रामभरोसे आहे. कशेडी घाटातून फारशी वाहने फिरवली जात नसली तरी काही वाहने व स्थानिक ग्रामस्थ अजूनही जुन्या घाटमार्गाचाच अवलंबून इच्छित स्थळ गाठत आहेत.

या घाटातील जुन्या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. पोलादपूर हद्दीतील भोगावनजीक घाटरस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी मार्ग खचला असून, मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यास मार्ग आणखी खचून वाहतूक बंद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकीकडे घाटातील मार्गाची दैना उडालेली असतानाच दुसरीकडे मात्र घाटरस्त्याच्या दुरुस्तीकडे खात्याने केलेल्या दुर्लक्षामुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 14/Jun/2025