रत्नागिरी : पावस मार्गावरून वायंगणी येथून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची गाडी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. सिद्धेश संदीप पर्शुराम (24, देवरूख, परशुराम वाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही अपघाताची घटना 9 जून रोजी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. गुरुवार 12 जून रोजी त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, सिद्धेश हा वायंगणी येथे हॉटेलमध्ये कामाला होता. तो सोमवार 9 जून रोजी पहाटे 4.30 वाजता वायंगणी येथून रत्नागिरीच्या दिशेने कामानिमित्त येत होता. यावेळी फणसोप दरम्यान रस्त्यावर गुरे आडवी आल्याने त्याने अचानक गाडीला ब्रेक लावला. यावेळी गाडी घसरुन रस्त्याच्या बाहेर सिद्धेश फेकला गेला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्त वाहत होते. तो जागेवर विव्हळत होता. रस्त्याच्या कडेला तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. पावस मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी त्याला प्रथम फणसोप येथे सकाळी दाखल करण्यात आले. याची माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली. नातेवाईक तातडीने फणसोप येथे दाखल झाले. तेथील डॉक्टरांनी त्याला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला कोल्हापूर येथे हलवण्यास सांगितले.
नातेवाईकांनी त्याला कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयात दाखल केले. मात्र तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. अखेर तीन दिवसांनी 12 जून रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच वायंगणी येथील मित्रपरिवारासह देवरूखमधील नातेवाईकांनी रत्नागिरीत धाव घेतली. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. एक उमदा तरुण गेल्याने देवरूख परशुराम वाडी येथे शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 14-06-2025














