रत्नागिरी : शहरापासून जवळच असलेल्या नाचणे परिसरात सकाळी ७.०५ वाजताची एकमेव शहरी बस आहे. ती गेल्यानंतर एक तासानंतर बस आहे; मात्र तासाभरात विद्यार्थी, प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि गैरसोय होते. एकच बस असल्याने ती आधीच भरून येते. त्यामुळे पुढील मार्गावर न थांबता निघून जात असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर कॉलेजला पोहोचता येत नाही. परिणामी, विद्यार्थी, प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळच्या सत्रात एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शांतीनगर, गोडावून, नाचणे या मार्गावर शहरी बसची कमतरता आहे. सकाळी साडेसात वाजता शहरातील काही महाविद्यालये, शाळा भरतात. त्यामुळे वेळेवर पोहोचण्यासाठी सकाळी ७.०५ ची बस उपयुक्त ठरते; मात्र ही बस टेंभ्येपूल मार्गावरून येत असल्याने आधीच भरलेली असते. त्यामुळे नाचणे मार्गावर थांब्यावर थांबत नाही. प्रवाशांना न घेता निघून जाते. सध्या दहावी, बारावीचे जादा अभ्यासवर्ग सुरू आहेत. सीबीएसई माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या असून, सोमवारी (ता. १६) पासून सर्वच माध्यमांच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा गर्दी वाढणार आहे. नाचणे मार्गावर विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन ७.०५ व सव्वासात वाजता एकतरी बस सोडणे गरजेचे आहे.
जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात पोहोचणे सोयीचे होणार आहे. याबाबत प्रवाशांनी नाचणे मार्गावर सकाळच्या सत्रात फेरी वाढवण्याची मागणी केली होती; परंतु एसटी प्रशासनाकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. किमान विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी तरी या मार्गावर नवीन फेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवासी व विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 14/Jun/2025














