चिपळूण : पालिकेने इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील जागा अखिल भारतीय नाट्य परिषदेला नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे विना मोबदला दिली आहे. त्या विरोधात माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. पालिकेने ती जागा तत्काळ ताब्यात घेऊन आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात मुकादम यांनी म्हटले आहे की, चिपळूण पालिकेने सुमारे ११ कोटी रुपये खर्च करून इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण केले. केंद्रातील एक कक्ष कोणतीही कार्यवाही न करता विना मोबदला दीर्घ मुदतीच्या वापरासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेला देण्यात आला आहे. पालिकेच्या स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण करणे व भाडेपट्ट्याने जागा देणे याबाबत पालिका अधिनियमातील तरतुदी व स्थायी निर्देशाचे पालन करणे पालिकेला बंधनकारक असते. नाट्य परिषद शाखा चिपळूणला देण्यात आलेली जागा २२५ स्क्वेअर फूट इतकी आहे. त्याचे मूल्य दहा लाख इतके होते. बाजारभावानुसार या जागेचे मूल्य कमीत कमी ३० लाखापर्यंत होईल. असे असताना राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता किंवा शासनाकडे प्रस्ताव न पाठवता पालिकेने हे कक्ष नाख्य परिषदेला दिले आहे. ते पूर्णपणे चुकीचे आणि बेकादेशीर आहे. नाट्य परिषदेला ही जागा देताना पालिकेने कोणतीही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.
सांस्कृतिक केंद्रात होणाऱ्या व्यावसायिक नाटक कंपनीतील अभिनते, अभिनेत्री व नाट्यसमूहातील इतर कलाकारांच्या मेकअप सुविधासाठी हा कक्ष यापूर्वी वापरला जात होता. त्यांची आता गैरसोय होणार आहे. त्यामुळे पालिकेने ही जागा तत्काळ ताब्यात घ्यावी अशी मागणी मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 14/Oct/2024











