राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील वहाळ आणि गटारांची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसाचे पाणी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. गेली अनेक वर्षे तक्रारी आणि निवेदने देऊनही या वहाळांमधील गाळ काढण्यात न आल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीनारायण मंदिरापासून राजन रानडे, अनंत रानडे, राजू रानडे, दत्तात्रय रानडे, प्रकाश भावे यांच्या घरांच्या मागून कुंभारमळ्यापर्यंत नदीला मिळणाऱ्या वहाळाची कित्येक वर्षांपासून साफसफाई झालेली नाही. या वहाळाला लागून अनेक नागरिकांची घरे असल्याने, जर काही नुकसान झाले तर त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
याशिवाय, दिवटेवाडीतून येणाऱ्या वहाळाचे पाणी दिवटे आणि नलावडे यांच्या घराजवळील वहाळात टाकलेल्या पाइपलाइनमधून पूर्णपणे लिकेज होत आहे. श्रीकांत ताम्हणकर यांनी वेळोवेळी याबद्दल तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डास आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच, नातार छापखान्यापासून येणाऱ्या गटाराकडेही दुर्लक्ष झाल्याने त्याचे पाणीही रस्त्यावर येत आहे.
या सर्व गंभीर समस्यांवर नगर परिषद कधी कार्यवाही करणार, याचा जाब विचारण्यासाठी प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व नागरिक एकत्र येऊन निवेदन देत आहेत. त्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. यावेळी सुशांत मराठे, श्रीकांत तमानकर, अमृत तांबडे, महेंद्र लेले, राजन रानडे, संजय ओगले, रानडे बंधू, श्रुती तामनकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 14/Jun/2025














