रत्नागिरी : मराठी अभिजात दर्जाच्य़ा अनुषंगाने विश्व मराठी परिषदेचा कौशल्यविकास अभ्यासक्रम

रत्नागिरी : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. आता त्यापुढे काय, या विषयाच्या अनुषंगाने विश्व मराठी परिषदेने ऑनलाइन कौशल्यविकास अभ्यासक्रम आयोजित केला आहे.

तो तीन आठवडे झुम द्वारे चालणार आहे. तत्पूर्वी अभ्यासक्रमाबाबतचे दोन दिवसांचे चर्चासत्र येत्या १८ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि प्रत्येक मराठी मनामध्ये आपल्या मातृभाषेबद्दलचा आदर द्विगुणित झाला. मात्र अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय, त्याचे निकष कोणते, दर्जा मिळाल्याचे फायदे नक्की कोणते आणि कोणाला, आता मराठी समाजाची, राजकारण्यांची, अभ्यासकांची आणि सामान्य नागरिकांचीसुद्धा झाली आहे. त्यामुळे मिळालेले अधिकार कोणते, जबाबदारी आणि कर्तव्ये कोणती, अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. त्यासाठी विश्व मराठी परिषदेतर्फे याविषयी दोन दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. अनिकेत पाटील हे व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लोकचळवळ उभारण्यात मोलाची भूमिका बजावणारे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (पूर्वाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, संस्थापक मार्गदर्शक – विश्व मराठी परिषद, प्रख्यात लेखक, वक्ते, ज्येष्ठ कवी) मार्गदर्शन करणार आहेत. पहिल्या सत्रात मराठीचा अभिजात दर्जा : लढा, यश आणि त्याचे विविध आयाम, तर दुसऱ्या सत्रात दर्जा तर मिळाला आता पुढे काय? याविषयी ते बोलणार आहेत. येत्या १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत ही ऑनलाइन व्याख्याने Zoom द्वारे होणार आहेत.

त्यासाठी https://zoom.us/j/99187403302?pwd=qNLXQJ88oGwvtcXUQkfujJoXY0GFbh.1 ही लिंक देण्यात आली असून मीटिंग आयडी 991 8740 3302, तर पासवर्ड 123456 असा आहे. या विषयासंदर्भात आपले प्रश्न व्हॉट्स अॅपद्वारे 7066251262 या क्रमांकावर १७ ऑक्टोबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. व्याख्यानादरम्यान आणि व्याख्यानानंतर या प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 14-10-2024