तत्काळ तिकीटासाठी १५ जुलैपासून ‘ओटीपी’ विना बुकिंग नाही!

बडनेरा : सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट योजनेचा सुलभपणे लाभमिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. लवकरच या निर्णयाची रेल्वे प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जाणार आहे.

१ जुलैपासून तत्काळ सुविधा अंतर्गत तिकिटांची बुकिंग फक्त भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) च्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपमार्फत आधार प्रमाणीकरण केलेल्या वापरकर्त्याद्वारेच शक्य असणार आहे. यासोबतच १५ जुलैपासून तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आला आहे.

तत्काळ तिकिटांची बुकिंग रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काउंटरवर किंवा अधिकृत एजंटांमार्फत सिस्टमद्वारे पाठवलेल्या ओटीपीच्या प्रमाणीकरणानंतरच होऊ शकतो. हा ओटीपी प्रवाशाने बुकिंग करताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे. ही सुविधादेखील १५ जुलैपासून लागू करण्यात येईल. रेल्वे प्रशासनाकडून नव्याने सुरू केलेल्या सोई सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

एजंटांच्या अवाजवी हस्तक्षेपाला आवर
रेल्वेचे अधिकृत तिकीट एजंट तत्काळ बुकिंगच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या ३० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करू शकणार नाहीत. वातानुकूलित (एसी) वर्गासाठी तत्काळ तिकीट बुकिंगची परवानगी सकाळी १० ते १०:३० या वेळेत अधिकृत एजंटांना दिली जाणार नाही. स्लीपर वर्गासाठी तत्काळ तिकीट बुकिंगची परवानगी सकाळी ११ ते ११:३० या वेळेत अधिकृत एजंटांना दिली जाणार नाही. या सुधारित तरतुदीचा उद्देश तत्काळ बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि सामान्य प्रवाशांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ मिळावा असा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 14-06-2025