रत्नागिरी, ता. १३: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम वेगाने सुरू झाले आहे. ११ जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, १ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.
मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ वर्ग महानगरपालिकांसाठी ही पद्धत लागू होईल, तर ‘ड’ वर्ग महानगरपालिकांसाठीही याच पद्धतीने प्रभाग रचना केली जाणार आहे. यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
प्रभाग रचनेचे सविस्तर वेळापत्रक असे आहे:
११ ते १६ जून: मुख्याधिकाऱ्यांमार्फत प्रगणक गटाची मांडणी.
१७ ते १८ जून: जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे.
११ ते २३ जून: स्थळपाहणी.
२४ ते २६ जून: गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे.
२७ ते ३० जून: नकाशावर निश्चित केलेल्या प्रभागांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी.
१ ते ३ जुलै: प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर स्वाक्षऱ्या करणे.
४ ते ८ जुलै: प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठवणे.
१५ ते २१ जुलै: प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे आणि हरकती व सूचना मागवणे.
२२ ते ३१ जुलै: जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांद्वारे प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे.
१ ते ७ ऑगस्ट: सुनावणीनंतर हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम केलेली प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगास मान्यतेसाठी पाठवणे.
२२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर: राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभागरचना संबंधित मुख्याधिकारी यांच्यामार्फत अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे.
या वेळापत्रकानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 14-06-2025














