ब्रेकिंग : Bacchu Kadu Hunger Strike: बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित! महायुती सरकारने दिली 3 आश्वासने

Bacchu Kadu Andolan: शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले.

त्यानंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना निधी यासह १७ मागण्यांसाठी ८ जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये हे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.

महायुती सरकारकडून लेखी आश्वासन

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (१३ जून) आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सरकारच्या वतीने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले.

शेतकरी कर्ज माफीसाठी १५ दिवसामधे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.

दिव्यांगाच्या मानधन वाढी बाबत ३० जून च्या पुरवणी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.

उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील.

अन्नत्याग आणि चक्का जाम आंदोलन स्थगित

सरकारकडून प्रमुख मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

“सरकारतर्फे लेखी आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच उद्या (१५ जून) होणारे चक्का जाम हे देखील स्थगित करण्यात आले आहे”, असे बच्चू कडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 14-06-2025