चिपळूण : केंद्र सरकारने भातपिकाच्या आधारभूत किमतीमध्ये प्रतिक्विंटल केवळ ६९ रुपयांची वाढ केली आहे. लहरी हवामानामुळे भातशेती आधीच अडचणीत आहे. यंदाच्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे भात उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भातपिकाच्या आधारभूत किमतीमध्ये नाममात्र वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सन्मानाची चेष्टा केली आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे चिपळूण विधानसभा अध्यक्ष बाळा कदम यांनी केली.
कदम म्हणाले, शेतमजूर मिळत नसल्याने कोकणातील शेतकऱ्यांना शेतनांगरणी, भातलावणी, भातकापणीची कामे कृषियंत्रांद्वारे करावी लागत आहेत. कृषियंत्रासाठी लागणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. भात बियाण्यांचे दर, खतांचे दर दुप्पट वाढले आहेत. त्यामुळे भात पिकाचा उत्पादन खर्च वाढला आहे, तसेच अतिवृष्टी, पुरस्थिती, करपा रोग यामुळे भातशेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे. यावर्षी तर हंगामाआधीच मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेतजमिनीत ओलावा वाढून भात बियाणे पूर्णक्षमतेने उगवेल की, नाही? अशी शंका आहे. असे असताना मोदी सरकारने भातपिकाची किमान आधारभूत किंमत वाढवताना त्यात केवळ ६९ रुपयांची वाढ करून मोठा गाजावाजा केला; परंतु ही वाढ तुटपुंजी आणि शेतकऱ्याची चेष्टा करणारी आहे.
उत्पादन खर्च न भागवणारी वाढ
कदम म्हणाले, भातशेतीला लागणाऱ्या खतांच्या किमती दुपटीने वाढवल्या आहेत. प्रतिक्विंटल २३०० रुपये असलेल्या भाताच्या आधारभूत किमतीत आता ६९ रुपयांची वाढ करण्यात आली; मात्र या आधारभूत किमतीतून भातशेतीचा उत्पादन खर्चदेखील भागत नाही. त्यामुळे भाताच्या आधारभूत किमतीत केलेली वाढ म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान नसून, मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या सन्मानाची चेष्टा केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 14/Jun/2025














